सिन्नर तालुक्यात धडक कारवाई

नाशिक : सिन्नर तालुक्यातील शहा-कारवाडी, विघनवाडी आणि पुतळेवाडी परिसरातील दूध संकलन केंद्रे व खवा उत्पादकांवर नाशिकच्या अन्न सुरक्षा विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी धाड टाकली. या धडक कारवाईत बनावट दूध आणि खवा बनवण्यासाठी वापरले जाणारे रासायनिक साहित्य पथकाच्या हाती लागले आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कारवाईपूर्वी सकाळपासून विभागातील १२ अधिकाऱ्यांच्या पथकाने छापे टाकण्यात येणाऱ्या केंद्रांवर गुप्तपणे लक्ष ठेवले होते. खात्री झाल्यानंतर स्वतंत्र पथकांव्दारे एकाचवेळी छापे टाकण्यात आले. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये पावडर किंवा इतर कोणत्या पदार्थांची भेसळ होत आहे काय, याची तपासणी करण्यात आली. या छाप्यांदरम्यान नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे तसेच काही साहित्यही जप्त करण्यात आल्याचे सांगितले जाते. खबरदारी म्हणून छाप्यांवेळी वावी पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्तही घेण्यात आला होता. मोहिमेत तब्बल १७ लाख ३७ हजार ५२९ रुपयांचा दूध पावडरचा विनापरवाना साठा जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासणीत दूध आणि खवा तयार करण्यासाठी मेलामाइन सारख्या धोकादायक रासायनिक पदार्थांचा आणि पांढऱ्या रंगाच्या पावडरचा वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. पथकाने सर्व संशयास्पद पदार्थांचे नमुने जप्त केले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.हा भेसळयुक्त खवा व दूध कोणत्या बाजारपेठांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये पुरवला जात होता, याचा शोध आता प्रशासन घेत आहे. ही मोहीम केवळ नमुने घेण्यापुरती मर्यादित नसून, भेसळीचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त उद्ध्वस्त करण्यासाठी राबवली जात आहे.

![]()












