येत्या सोमवारी २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे

नाशिक : एकीकडे राज्यात शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार फुटीवरून गदारोळ झाल्याचे चित्र दिसत असतानाच दुसरीकडे राज्यभरात विधानपरिषद निवडणुकीचे मतदान पार पडले. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (गुरुवार) सकाळी ८ वाजेपासून मतदानास सुरवात झाली. जिल्ह्यात नऊ ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. या सर्व मतदान केंद्रांवर सकाळच्या सुमारास मतदारांचा शांत प्रतिसाद बघायला मिळाला. मात्र, दुपारनंतर मतदार केंद्रांवर जाऊन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सायंकाळी चार वाजेपर्यंत नाशिक विधान परिषदेसाठी ९९.८४ टक्के इतके मतदान झाले होते. नाशिक विधानपरिषदेच्या एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर जाऊन मतदान केले. यात ३१९ महिला नगरसेविका आणि २९९ पुरुष नगरसेवकांचा समावेश आहे. तर मालेगाव महापालिकेतील एका नगरसेवकाने मतदानाचा हक्क बजावला नसल्याने एकूण ६१८ मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले असून, एका मतदान केंद्रावर ९८.८१ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेने (महाविकास आघाडीने) अधिकृत उमेदवार उभा न केल्यामुळे ही लढत महायुती आणि बंडखोरांभोवती फिरत राहिल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिंदे गटाच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे होते. मात्र भाजपचे माजी नगरसेवक गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने स्पर्धा निर्माण झाली होती. महायुतीच्या नेत्यांनी गिते यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मतदानाच्या आठ दिवस आधी आपला प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी दराडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. दरम्यान, गिते आणि हिरे यांनी कायदेशीर मुदतीनंतर थांबण्याचा निर्णय घेतल्याने मतपत्रिकेवर दोघांचीही नावे कायम होती. यामुळे पसंतीक्रमाची मते फुटण्याची धास्ती महायुतीला असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता सोमवार (दि.२२) रोजी लागणार्या निकालावेळीच कोणाची किती मते फुटली हे स्पष्ट होईल. या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे महायुती जवळ पुरेसे संख्याबळ असताना देखील आपल्या सर्व नगरसेवकांना त्यांनी ठाणे आणि भिवंडी येथील हॉटेल्स वर ठेवले होते.

![]()












