18 जूनला नेमकं काय घडणार

नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. नाशिक जिल्ह्यात महायुतीकडे तब्बल 450 मतदारांचे स्पष्ट आणि प्रचंड बहुमत आहे, तसेच विरोधी पक्षाचा कोणताही अधिकृत उमेदवार मैदानात नाही. असे असतानाही महायुतीमध्ये कमालीची धाकधूक पाहायला मिळत असून, ऐनवेळचा दगाफटका टाळण्यासाठी थेट ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा अवलंब करावा लागला आहे. त्यातच आता ठाकरे गटाच्या शिवसेनेत सुरू असलेल्या चर्चेने विधानसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.मिळालेल्या माहितीनुसार आम्ही पक्ष नेतृत्वासोबत बोलून स्थानिक महाविकास आघाडीच्या बैठकीत युतीच्या विरोधात मतदानाचा अजेंडा राबवणार आहोत. नाशिक विधान परिषद निवडणुकीसंदर्भात लवकरच महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतील.” ठाकरे गटाच्या एका वरीष्ठ नेत्याच्या विधानामुळे गोकुळ गीते यांच्या उमेदवारीची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाली असून महाविकास आघाडी युतीच्या उमेदवाराविरोधात छुपे मतदान घडवून आणण्याची मोठी खेळी खेळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, नाशिक विधान परिषद निवडणुकीत मागील काही दिवसांत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या कार्यपद्धतीवर मित्रपक्ष भाजपचे बंडखोर,अजित पवार गटाची राष्ट्रवादी,अपक्ष उमेदवार, आणि खुद्द शिंदे गटातील शिवसेनेच्या काही नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांची बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे आणि मंत्री उदय सामंत या तीन बड्या मंत्र्यांना नाशिकमध्ये ठाण मांडावे लागले होते. दीर्घ चर्चेनंतर गोकुळ गिते यांनी माघार घेतली आहे, तरी तांत्रिक अडचण अशी आहे की, गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे या दोन्ही बंडखोरांची नावे मतपत्रिकेवर कायम असणार आहेत. याच तांत्रिक बाबीचा फायदा महाविकास आघाडी घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. शिवसेना शिंदे गटाचे शहरी आणि ग्रामीण भागातील नगरसेवक ठाण्याच्या दिशेने रवाना झाले होते, तर सोमवारी भाजपचे नगरसेवक देखील ठाण्याकडे सहलीसाठी रवाना झाले आहेत. 18 जून रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी कोणतीही जोखीम न पत्करण्यासाठी या सर्व लोकप्रतिनिधींना थेट मतदानाच्या दिवशीच नाशिकमध्ये आणले जाणार आहे.

![]()












