त्रंबकेश्वर मंदिर संस्थांचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांना अटक

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जात होता. “रांगेत उभे राहू नका, आम्ही तुम्हाला थेट दर्शन घडवून देतो,” असे आमिष दाखवून दलाल आणि एजंट भाविकांकडून हजारो रुपये उकळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. आधीच भाविकांना झालेल्या मारहाण प्रकरणामुळे मंदिर चर्चेत असताना आता या आर्थिक लुटीमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली असताना पोलिसानी आज मोठी कारवाई केल्यानंतर खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर संस्थानचे विश्वस्त आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी पुरुषोत्तम कडलग यांना अटक करण्यात आली आहे. महादेवाच्या दर्शनाच्या काळाबाजार प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसानी कारवाई केल्याचे समजते. त्र्यंबकेश्वर मंदिरात ‘व्हीआयपी’ दर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. 11 एप्रिल रोजी पंचवटी परिसरातील अनंता सुरेश मेहंदळे(वय 46) हे त्यांचे मित्र दर्शनासाठी आले होते. त्यांनी अधिकृत 200 रुपयांचा देणगी पास घेतला होता. मात्र रांगेत उभे असताना काही संशयितांनी त्यांच्याशी संपर्क साधला.रांगेतून दर्शनाला 4 ते 5 तास लागतील, आम्ही 10 मिनिटांत दर्शन घडवतो,” असे सांगत गोटीराम मनाजी पेहरे(वय 41 रा. त्र्यंबकेश्वर) याने त्यांना आमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी 3 हजार रुपये रोख घेत घेतले यादरम्यान दुसरा संशयित अभिषेक कडलग (रा. त्रंबकेश्वर)याच्या मदतीने मंदिर गाभाऱ्यात प्रवेश दिला. विशेष म्हणजे, देवस्थान ट्रस्टकडून कोणतीही अधिकृत ‘पेड दर्शन’ सुविधा नसतानाही ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अनंता मेहंदळे यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती . त्यानंतर पोलिसांनी गोटीराम पेहरे आणि अभिषेक कडलक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला यामध्ये गोटीराम पेहरे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले तर अभिषेक कडलक हा फरार होता. या तपासा दरम्यान या संपूर्ण तिकिटाच्या काळाबाजारात विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांचा हात असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले त्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी पुरुषोत्तम कडलक यांना अटक केली त्यामुळे धार्मिक व राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी प्रवेशासाठी कडक नियम आहेत. सुरक्षारक्षक कोणालाही थेट प्रवेश देत नाहीत. त्यासाठी विश्वस्तांची परवानगी किंवा अधिकृत नोंद आवश्यक असते. प्रत्येक भाविकाची माहिती नोंदवहीत नोंदवली जाते. मात्र एवढी काटेकोर व्यवस्था असतानाही बाहेरील व्यक्ती भाविकांना थेट मंदिरात कशी नेत होती, असा प्रश्न उपस्थित होत होता.

![]()












