महात्मा फुले सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण संस्थेतर्फे सत्कार समारंभ उत्साहात
सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक संघटनेच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे कलाशिक्षक विजय खैरनार यांना प्रतिष्ठित राज्यस्तरीय कलाशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याध्यक्ष नरेंद्र बाराई आणि कला संघाचे संचालक चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
विजय खैरनार यांनी विद्यालयात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सातत्याने मोलाचे योगदान दिले आहे. विशेषतः एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट चित्रकला परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशामागे त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. याशिवाय शालेय सांस्कृतिक कार्यक्रमांतील वेशभूषा, रंगरंगोटी तसेच विविध कला उपक्रमांमध्ये त्यांनी केलेले कार्य नेहमीच उल्लेखनीय राहिले आहे. त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय सन्मान मिळाला.
या यशाच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण संस्थेतर्फे विद्यालयात खैरनार यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष एन. एस. मंडलिक, उपाध्यक्ष अरुण माळी, संचालक पोपटराव सोमवंशी, बाजीराव खैरे, एन. एम. पवार तसेच निलेश खैरे उपस्थित होते. संस्थेचे सचिव व्ही. के. खैरे यांच्या हस्ते खैरनार यांचा गौरव करण्यात आला.
सत्कारास प्रतिसाद देताना विजय खैरनार यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील गुण जोपासण्याचे आवाहन केले. “विद्यार्थ्यांनी आपल्यातील कला विकसित केली, तर त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होतो. हा सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण विद्यालयाचा आहे,” असे त्यांनी नमूद केले.
या यशामुळे विद्यालयासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, खैरनार यांच्या कार्याचा अभिमान सर्वत्र व्यक्त केला जात आहे.

![]()












