नाशकात मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष

नाशिक : गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात चर्चा असलेल्या ठाकरे गटाची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अखेर झाली असून याबाबतची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.यादरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले माझी एक मुलाखत झाली होती. त्यावेळी मी कुठल्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचे म्हटले होते. माझ्या त्या वाक्यापासून शिवसेना-मनसे एकत्र येण्याची सुरुवात झाली. कोण किती जागा लढणार, हे आम्ही आताच सांगणार नाही. कारण महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. त्यामध्ये आणखी दोन टोळ्यांची भर पडली आहे. ते राजकीय पक्षातील मुलं पळवतात. शिवसेना-मनसेच्या दोन्ही पक्षातील उमेदवारांना अर्ज कधी भरायचा, हे सांगितले जाईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले. यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित पत्रकारांनाही एक आवाहन केले. त्यांनी म्हटले की, ज्यांचं महाराष्ट्रावर आणि मुंबईवर प्रेम आहे, त्यांनी आमच्या पाठीशी उभे राहा, असे ते म्हणाले. तसेच राज ठाकरे यांनी मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असेही ठणकावून सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले भाजपला मुंबईचे लचके तोडायचे आहेत, चिंधड्या करायच्या आहेत. आता आम्ही भांडत राहिलो तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांचा अपमान होईल. आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आलोय. आम्ही एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी, हे मी पूर्वीच सांगितले आहे. यापुढे मुंबई आणि महाराष्ट्राकडे जो कोणी वाकड्या नजरेने पाहील त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपने कटेंगे तो बटेंगे असा अपप्रचार केला होता. आता मी मराठी माणसाला सांगतो की, आता चुकाल तर संपाल, त्यामुळे मराठीचा वसा टाकू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. मराठी माणूस कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी त्याच्या वाटेला कोणी आला तर त्याला परत जाऊ देत नाही असं म्हणून एक प्रकारे उध्दव ठाकरेंनी इशाराच दिला आहे. युती झाल्यानंतर ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जोरदार जल्लोष साजरा केला.

![]()












