एटीएमच्या हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी

नाशिक : इंदिरानगर परिसरातील विनयनगर परिसरात धक्कादायक घटना घडली असून चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवून नेल्याची घटना घडली. मुख्य म्हणजे चोरट्यांनी एटीएमची कोणतीही तोडफोड न करता अगदी सहजपणे एटीएम चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार विनयनगर येथील एटीएम इंडिया बँकेचे असून याठिकाणी वर्दळ नसते मात्र चोरट्यानी या ठिकाणी असलेल्या एटीएमचा शोध घेत त्यातील रक्कम न चोरता थेट संपूर्ण मशीनच काढून नेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या एटीएम मध्ये 26 हजार 500 रुपये असल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांनी दिली.एटीएम फोडीच्या घटना आपण बऱ्याचदा ऐकल्या आहेत. चोरट्यांनी मोठमोठ्या शस्त्रांनी एटीएम मशीन फोडून पैसे चोरल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. विशेष म्हणजे अशा चोरीच्या घटनांमध्ये एखादा सुरक्षा रक्षकही जखमी होत असल्याच्या बातम्या आपण ऐकल्या किंवा वाचल्या असतील

मात्र, विनयनगर येथे तर विचित्र घटना घडली आहे. चोरट्यांनी एटीएमची कोणतीही तोडफोड न करताच सहजपणे एटीएम चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्य म्हणजे याठिकाणी हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असताना देखील चोरट्यानी हिंमत दाखवली याचीच चर्चा परिसरात असून ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असून शेजारी ज्वेलर्सचे दुकान देखील आहे. अगदी दोन दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त आपल्या दारी या संकल्पनेतुन परिसरातील नागरिक आणि पोलिसांची बैठक देखील झाली होती यामध्ये नागरिकांनी या भागात असलेल्या टवाळखोरांना लगाम घालण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्याची मागणी देखील केली होती. आणि त्यानंतर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये चर्चा होती तर अनेकदा विनयनगर पोलीस चौकी बंदच असल्याचे देखील नागरिक सांगतात. मुंबई नाका पोलिसांबरोबर आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी घटनास्थळी पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. चोरट्यांनी हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस चौकीपासून एटीएम मशीनच गायब केल्याने चोरट्यांनी एकप्रकारे कायदा-सुव्यवस्थेला आवाहन दिल्याची चर्चा परिसरात आहे.

![]()












