एक्सवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी “तो” व्हिडीओ केला पोस्ट

नाशिक : काल मध्यरात्री नाशिक शहरात पोलिसांच्या आठ वाहनाने अगदी सिनेस्टाईल पद्धतीने 25 कि. मी पाठलाग करत वाहनातून 28 किलो गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आले. या थरारक पाठलागाचा व्हिडीओ खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “एक्स” वर शेअर करत नाशिक पोलिसांचे अभिनंदन केले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथकाकडून नववा मैल हद्दीमध्ये रात्री तीन वाजता पोलीस हवालदार भाऊराव गांगुर्डे, बाळकृष्ण पवार “स्टॉप अँड सर्च” या उपक्रमांतर्गत वाहन तपासणी करत असताना एक लाल रंगाची कार (एमएच 02 जेपी 0123) सुसाट येताना दिसली.पोलीस पथकाने कार चालकाला थांबण्याचा इशारा केला असता त्याने वेगाने कार पळवली.यादरम्यान पोलिस अंमलदारांच्या अंगावर वाहन टाकण्याचाही त्याने प्रयत्न केला. पोलीस हवालदार भाऊराव गांगुर्डे आणि बाळकृष्ण पवार यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलीस नियंत्रण कक्षा ला कॉल दिला हा कॉल कक्षातील अंमलदार सुगंधा नवले यांनी तात्काळ घेत अन्य रात्रगस्तीवरील वाहनांना मदतीसाठी रवाना केलीत. आणि मग सुरू झाला चित्रपटालाही लाजवेल असा पाठलाग, मध्यरात्रीच्या सुमारास नाशिकच्या रस्त्यांवर पुढे लाल रंगाची कार आणि पाठीमागे सायरन वाजवत दिव्यांच्या झगमगाटात पोलीस पथकाची आठ वाहने हा पाठलाग रात्री तासभर चालल्यानंतर कार, आरोपी आणि गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पोलिसांच्या “स्टॉप अँड सर्च” कारवाईचा उल्लेख करत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह या कारवाईत सहभागी असलेल्या संपूर्ण पोलीस टीमचे अभिनंदन अशा शब्दात मजकूर लिहून पाठलागाचा व्हिडिओ “एक्स” वर पोस्ट केला आहे.

![]()















