दरवर्षी अंदाजपत्रकात खड्यांवर 30 कोटींची तरतूद, मग निधी जातो कुठे ?

नाशिक : शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने नुसतेच खड्डेच पडले नसून महापालिकेचे पितळ देखील उघडे केले आहे. दरवर्षी पाऊस पडतो तितक्याच वेगाने खड्डे पडतात त्यानंतर ते खड्डे तितक्याच लगबगीने कच, माती टाकून बुजविले जातात आणि पुन्हा खड्डे पडतात. दरवर्षी हे काम नित्यनियमाने केले जाते. यावर्षी तर शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळन झाली आहे नाशिकरोड, जेलरोड, साईनाथ नगर, सातपूर या ठिकाणी वाहन चालवताना नागरिक आपला जीव धोक्यात घालून वाहन चालवत आहेत. जेलरोड परिसरात संपूर्ण भारतात परिचित असलेले नोट प्रेस असताना देखील त्यासमोरच मोठमोठाले खड्डे पडले आहेत तरीदेखील महापालिका अधिकारी सर्वकाही अलबेल असल्यागत वागत आहेत. यावर्षी तर खड्यांमुळे दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला तरी त्याच सोयरसुतक महापालिकेला नाही हे विशेष काही दिवसांपूर्वी भगूर येथील वेताळबाबा रोडवर जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने खड्डा खणून ठेवला होता आणि हा खड्डाच एका व्यक्तीसाठी जीवघेणा ठरला अमित रामदास गाढवे हे दुचाकी चालक त्या रस्त्याने जात असताना तो खड्डा लक्षात न आल्याने ते दुचाकीसह खड्ड्यात कोसळून जागीच ठार झाले मुख्य म्हणजे त्यांनी हेल्मेट घातलेले होते म्हणजेच नगरपालिकेच्या गलथान कारभाराचा फटका एका निष्पाप व्यक्तीला भोगावा लागला. तर दुसरीकडे आडगाव मेडिकल कॉलेज समोर पडलेल्या पावसामुळे खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर रस्ते देखील निसरडे झाल्याने योगिता दिलीप कडाळे या दुचाकीने प्रवास करत असताना निसरड्या रस्त्यांवर दुचाकी घसरली व त्या खाली पडल्या डोक्याला मार लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला . त्याचबरोबर शहरातील चांगले रस्ते गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आले परंतु त्यानंतर ते रस्ते व्यवस्थित करण्यात आले नाही. दरवर्षी पाऊस पडतो आणि पुन्हा पुन्हा खड्डे पडतात म्हणजेच ठेकेदारांनी केलेले काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. मग त्या ठेकेदारांना काळ्या यादीत का टाकले जात नाही ? रस्त्यांवर 30 कोटी खर्च ? मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी फक्त खड्डे बुजविण्यासाठी 30 कोटींची तरतूद केली जाते यामध्ये खड्डे बुजविण्यासाठी खडी, मुरूम डांबर टाकणे आदी बाबींचा समावेश असतो.त्यासाठी दरवर्षी विभागनिहाय ठेकेदार नियुक्त केले जातात.मात्र पावसाळा सुरू झाला की हे ठेकेदार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याप्रमाणे गायब होऊन जातात.त्यामुळे 30 कोटींच्या खर्चाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ पाहत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांना महापालिका व स्मार्ट सिटीच्या भोंगळ कारभाराचा मोठा फटका बसत आहे काही कंपन्यांनी तर सुंदर नाशिकच्या नावाखाली रस्त्यांची पार वाट लावून ठेवली आहे. एकीकडे महापालिका रस्ते खोदाई करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा फक्त इशारा देते तर दुसरीकडे याच महापालिकेच्या नाकावर टिच्चून स्मार्ट सिटी कडून भरपावसात रस्ते फोडले जातात .आज शहरात कुठेही जा आपल्याला खड्डेच बघायला मिळत आहे यामुळे अपघातात मोठ्याप्रमाणात वाढ झाली असून जागोजागी वाहतूक कोंडी देखील होऊ लागल्याने नाशिककर संताप व्यक्त करत असताना सुध्दा नाशिक महापालिका प्रशासन झोपेचे सोंग घेत असून नागरिकांनाच जीव इतका स्वस्त झाला आहे का ? हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळत असणार हे नक्की , जर महापालिकेचे प्रशासन इतका निष्काळजीपणा दाखवत असेल तर एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावर त्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा का दाखल करू नये अशी मागणी जोर धरू लागली आहे.


![]()











