
नाशिक: गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे . गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने गोदावरी नदीपात्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून सकाळी 8 वाजेच्या सुमारास 520 क्यूसेक वेगाने विसर्ग करण्यात आला.तर दुपारी 1 वाजेनंतर 2 हजार 282 क्यूसेक तर दुपारी 4 वाजेनंतर 3 हजार 900 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अनेक मंदिरे ही पाण्याखाली आली आहेत. तर नाशिक शहरातील पूर मापक असलेला दुतोड्या मारुतीची मूर्ती कमरेपर्यंत पाण्यात बुडाली आहे. जर मुसळधार पाऊस सुरूच राहिला तर टप्याटप्याने विसर्गात वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

![]()











